प्लेलिस्ट – वाट पाहुनी जीव शिणला…

>> हर्षवर्धन दातार

प्राचीन काळापासून ते अगदी आतापर्यंत जगाच्या कानाकोपऱयात ’नेमेचि आम्हांसी प्रसंग युद्धाचा’ अशीच परिस्थिती आहे. अस्थिरता आणि शत्रू हे नेहमी सीमेवर टपून बसलेले. त्यामुळे घरचा कर्ताकरविता पुरुष, पुत्र (आणि आता मुलगीही) वयात आला की, त्याची भरती सैन्यात व्हायची आणि सैन्याची रवानगी युद्धभूमीवर. मग घरची मंडळी देव पाण्यात बुडवून त्याच्या परतीच्या वाटेकडे डोळे लावून ’वाट’ पाहत बसायची. हे अगतिक करायला लावणारे वाट पाहणे व्यक्तीचे असते, कधी कधी त्याच्या पत्राचेसुद्धा असते. काही प्रसंग मात्र हे तितके जीवघेणे नसले तरी प्रेमाची परीक्षा पाहणारे, हुरहुर लावणारेही असतात. अनेकदा पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसीसुद्धा एकमेकांची वाट पाहत असतात. आज आपण बघू या हिंदी चित्रपटांतली आपल्याला ’इंतजार’ करायला लावणारी गाणी.

इंतजार विषयातील सर्वात लोकप्रिय आणि लगेच आठवणारे गाणे म्हणजे ’बहू-बेगम’ (1964) चित्रपटातील साहिर लुधियानवी-रोशन व रफी-आशा यांचे ’हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक’ अत्यंत श्रवणीय युगुल गीत. झीनत बेगम (मीना कुमारी) वाट पाहत आहे युसूफची (प्रदीप कुमार). तिला खात्री आहे, तो येईल आणि त्याकरिता ‘कयामत तक’ म्हणजेच जगाच्या शेवटपर्यंत वाट पाहायची तिची तयारी आहे. यात साहिरचे शब्द अर्थातच ’इंतजार’चा कळस आहे. आशाताईंनी अगतिकतेबरोबर आत्मविश्वास या दोन्ही परस्परविरोधी भावना समर्थपणे व्यक्त केल्या आहेत. अगदी आधीच्या म्हणजे चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळात आणि चाळीसच्या दशकात नूरजहांचे ‘बडी माँ’मधील (1945) झिया सरहदी लिखित आणि दत्ता कोरगावकर यांनी संगीतबद्ध केलेले ’आ इंतजार है तेरा’ आणि ‘बरसात’मधील (1949) हसरत-शंकर-जयकिशन आणि लताचं ’जिया बेकरार है, छायी बहार है’ ही इंतजार करायला लावणारी गाजलेली गाणी. ‘बडी माँ’मध्ये नूरजहांच्या बरोबर लताचं पण एक गाणं आहे. रुबाबदार देव आनंद आणि स्वप्नाळू डोळ्यांच्या निम्मीचा ‘सजा’ (1951) एक संगीतप्रधान आणि गाजलेल्या गाण्याचा चित्रपट. यात साहिर-सचिन देव बर्मन आणि लताचं ’आजा तेरा इंतजार है, तुझे ढूंढ रहा मेरा प्यार है’ हे एक विरहगीत. ‘हलाकू’ (1956) हा आणखी एक संगीतप्रधान चित्रपट. ‘हलाकू’ म्हणजे नृशंस, निर्दयी तुर्कस्तानचा अत्याचारी सुलतान आणि ही मुख्य भूमिका प्राणने केली असून अजित (परवेझ) आणि मीना कुमारी (नीलोफर) हे नायक-नायिका आहेत. शैलेंद्र -शंकर-जयकिशन – लता-रफी यांचे ’आजा के इंतजार में’ हे अतिशय श्रवणीय आणि खऱया अर्थाने विरहगीत. नायक अजितची व्याकूळता रफीने अगतिकतेने व्यक्त केली आहे. सुरुवातीची सुरावट वाल्ट्झ तालावर असून सुरुवात थोडीशी ’दिल कि नजर से’ या गाण्याकडे निर्देश करते. शंकर-जयकिशन म्हणजे विस्तृत वाद्यवृंद आणि या गाण्यात त्याची पूर्ण ओळख आपल्याला दिसते. ‘शतरंज’मध्ये (1956) राजेंद्र कृष्ण लिखित आणि चितळकर यांनी ( सी. रामचंद्र) स्वरबद्ध केलेले आणि स्वत गायलेले ’चली भी आ के तेरा इंतजार कब से है’ या रेकॉर्डवर ऐकू येणाऱया गझलनुमा गाण्यात परत आपल्याला पडद्यावर मीना कुमारी दिसते. सोबत आहेत दादामुनी अशोक कुमार. सी. रामचंद्र विशेष बैठकीच्या या गाण्यात कुठेतरी हलकेच तलत मेहमूद डोकावतो. ‘चार दिल चार राहे’ (1959) चित्रपटात साहिर-अनिल बिस्वासचे लताने गायलेले ’इंतजार और अभी’ हे लोकप्रिय गाणे. निद्रानाश जडलेला अन्वर हुसेन नर्तिका निम्मीला हे गाणे फर्माइश म्हणून सांगतो. लताच्या गायकीतून प्रतीक्षा आर्ततेने व्यक्त होते. मनोरुग्ण विषयावर आधारित ‘खामोशी’ (1969) हा एक गंभीर भावनाप्रधान आणि प्रेक्षकांना सुन्न करणारा चित्रपट. गुलजार- हेमंत कुमारच्या ’तुम पुकार लो’ या गाण्यातून धर्मेंद्र आणि वहिदा रेहमान या द्वयीच्या तीव्र भावनांच्या अभिव्यक्तीचे चित्रण दिसते. शब्द, संगीत आणि गायकी आपल्या मनात खोलवर रुजते. ’मुख्तसर’ अर्थात लहानशी किंवा सहज गोष्ट हा अप्रतिम शब्द गुलजारजींनी या गाण्यात प्रेमाची व्याख्या करताना गुंफला. कश्मीरच्या पार्श्वभूमीवर बेतलेला ’जब जब फूल खिले’ (1965) हा अजून एक संगीतप्रधान आणि गाणी अतिशय लोकप्रिय झालेला चित्रपट. मोहक नंदा आपल्याच कल्पनाविश्वात गुंग आहे आणि लताजींच्या आवाजात आपल्या आवडत्या व्यक्तीची वाट पाहत गुणगुणते आहे ’ये समा, समा है ये प्यार का, किसी के इंतजार का.’ आनंद बक्षींचे सरळसोपे शब्द आणि वातावरणात रोमँटिक माहौल फुलवणारे संगीत कल्याणजी आनंदजींचे. या वातावरणात ती इतकी मग्न असते की, हाऊसबोट वाहक राजा (शशी कपूर) आल्याची तिला चाहूलसुद्धा लागत नाही. गाणं मात्र लोकप्रिय आणि विविध भारती विशेष. ‘हमराही’ (1963) या चित्रपटातलं ’मुझ को अपने गले लगा लो’ हे गाणं गाजलं. याच चित्रपटात राजेंद्र कुमार आणि जमुनावर चित्रित ’कर के जिसका इंतजार, मेरा दिल गया हार’ हे रफी-लता युगुल गीत. संगीत शंकर- जयकिशन. उभयतांमध्ये काही गैरसमज होते, जे दूर झाले आहेत आणि दोघेही आता आनंदात आहेत. एकूण ‘अच्छे दिन’ वापस आये है. हर्प अल्बर्टच्या ’द लोनली बुल’ या मूळ सुरावटीवरून प्रेरणा घेऊन राहुल देव बर्मननी (पंचम) ’फिर कब मिलोगी’ (1974) या चित्रपटात ’कहीं करती होगी वो मेरा इंतजार’ हे अत्यंत मधुर आणि श्रवणीय गाणे दिले.

विश्वजित आणि माला सिन्हावर चित्रित आणि मुकेश- (अनपेक्षित!) लताचे स्वर या गाण्याला एका वेगळ्या उंचीवर नेतात. आकार्डियन, गिटार आणि बॉन्गोचा सुरेख वापर मजरूहनी लिहिलेल्या या कल्पनेला अजून काव्यात्मक करतात. पंचमने मुकेशला खूपच कमी गाणी दिली. तरीसुद्धा त्याच्या ’प्रामाणिक’ आवाजाचा त्याने निवडक गाण्यांत योग्य तो वापर केला. मनोज कुमार-मुमताज – वहिदा रेहमान या प्रेमत्रिकोण भूमिका असलेल्या ‘पत्थर के सनम’ (1967) चित्रपटात निष्पाप, भोळ्या वहिदा रेहमानची एन्ट्री ’कोई नही है फिर भी है मुझको न जाने किस्का इंतजार’ या काहीशा गूढ प्रकृतीच्या गाण्याने होते. मजरूह-लक्ष्मीकांत प्यारेलाल जोडी ही नेहमीची यशस्वी जोडी. आल्फ्रेड हिचकॉकच्या ’डायल एम फॉर मर्डर’ या गाजलेल्या रहस्यपटावर आधारित ’एतबार’(1985) हा मुकुल आनंद दिग्दर्शित चित्रपट बऱयापैकी चालला. हॉटेलच्या मैफलीत ’किसी नजर को तेरा इंतजार आज भी है’ ही गजल गाणाऱया सागर (सुरेश ओबेरॉयला प्रतीक्षा आहे नेहा (डिम्पल कपाडिया) या त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीची. गझलकार हसन कमाल यांच्या शब्दांना संगीत दिलं आहे बप्पी लाहिरींनी. गिटार आणि संतूरचे सूर शब्दांना एक खोल आणि मार्मिक अर्थ प्रदान करतात. जितका ‘डॉन’ (1979) हा चित्रपट गाजला तितकीच त्यातली गाणी. ’जिसका मुझे था इंतजार’ यात लताजींनी डॉनचा (अमिताभ) खात्मा करण्याच्या सूडाने पेटलेल्या झीनत अमानला प्लेबॅक दिला आहे. आठवडय़ातील आकडय़ांच्या बाराखडीवर आधारित ‘तेजाब’ (1987) या चित्रपटातील ’एक दो तीन… गिन गिन के इंतजार’ या गाण्याने नुसता धुमाकूळ घातला नाही, तर आपल्या मराठमोळ्या माधुरी दीक्षितला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसविले. ‘शराबी’ (1984) या ’सबकुछ अमिताभ’ चित्रपटात ’इंतेहा हो गयी इंतजार की’ या गाण्यातून विक्कीची (अमिताभ) मीना (जयाप्रदाच्या) प्रतीक्षेतली अगतिकता ‘इंतहा’ म्हणजेच कळस गाठते आणि अर्थात त्याच्या या अगतिकतेला प्रतिसाद देऊन मीना (जयाप्रदा) त्याला भेटायला येते. सुरुवातीला गिटारचे सूर आणि नंतर किशोर कुमारचा फुल्ल थ्रोटेड आवाज आणि आशाताईंची शेवटची एंट्रीमुळे गाण टिपेला जात. संगीतकार बाप्पी लाहिरी गाण्यात गिटार, व्हायोलिन्स आणि बॉन्गोचा एका चढत्या भाजणीसारखा वापर करून गाण क्लायमॅक्सला नेतात. आज आपण हिंदी चित्रपट संगीतात ’इंतजार’ शब्द असलेल्या असंख्य गाण्यांपैकी काही निवडक गाण्यांचा परामर्श घेतला. ’इंतजार’ हा शब्द नसलेली, पण अर्थ किंवा सूचक असलेली अनेक गाणी आहेत. त्याबद्दल पुढील भागात.
[email protected]
(लेखक संगीत अभ्यासक आहेत)