पाऊस सृजनसखा

लता गुठे / अनुबंध

प्रत्येक वयात भेटलेला पाऊस हा वेगळाच असतो. प्रत्येक वेळी नव्याने भेटल्याचा आनंद अवर्णनीयच. ती प्रत्येक भेट कवितेतून, शब्दांच्या माध्यमातून पांढऱया फट्ट पानांवर विविध रंगात साकार होताना तो आपला सृजनसखाच होतो.

प्रत्येक वयात भेटलेला पाऊस हा वेगळाच असतो हे मला नेहमी कविता लिहिताना जाणवतं. माझं लहानपण ग्रामीण भागात गेल्यामुळे तिथला पाऊस मनात रुजला आणि मोठेपणी तोच कवितेतून साकार झाला. मला नेहमी आठवतो तो शाळेच्या पत्र्यांवर तडतडत पाय आदळत येणारा पाऊस… पुढे जेव्हा बालसाहित्य लिहू लागले तेव्हा तो कवितेतून साकार झाला तो असा…

आला दारात पाऊस, घुंगरं थेंबाचे बांधून
शाळेच्या छतावर, गेला खुशाल नाचून

दर वर्षी पाऊस येतो आणि पहिला पाऊस तो नव्याने भेटल्याचा आनंद होतो, तो अवर्णनीय असा असतो. पाऊस जरी तोच असला तरी तो वेगवेगळ्या रंगात, रूपात जाणवतो. कधी तो रिमझिमत येतो तर कधी धुवांधार सरीतून कोसळतो. लहानपणी विजांचा लखलखाट अन् ढगांचा गडगडाट करत पाऊस यायचा तो पाऊस माझ्या बालमनात भीतीत दडून बसला. आजही कडकडायला लागलं की भीती वाटते. मात्र लपून बसायला आईची कुशी नसते. अवकाळी पाऊस नेहमी उन्हाळ्यात गारपिट करत यायचा. अंगणात टपोऱया गारांचा सडा पडायचा. फ्रॉकमध्ये गारा वेचण्यामध्ये काय मजा यायची म्हणून सांगू! आणि त्या गारा तोंडात टाकल्यानंतर मिळालेली मजा हे मात्र कधी शब्दात वर्णन करता नाही आलं. शाळेच्या बाकावर बसल्या बसल्या खिडकीतून पाहताना पाऊस वेगळाच जाणवायचा. असं वाटायचं, तो बाहू पसरून मला बोलावतो आहे. शाळा सुटल्यानंतर जागोजागी खड्डय़ात साठलेले पाणी आणि ते पायाने उडवत चालताना आलेली मौज… कशी शब्दांच्या चिमटीत पकडायची? एका कवितेमध्ये मी त्याचे क्षणचित्र रेखाटले ते असे-

आली सर गेली सर, कुठे कुठे रेंगाळत
कुठे गढूळले डोह, कुठे ओघळ वाटेत

कधी शेतात जाताना अचानक सूर्याच्या समोर पावसाचे काळे कुट्ट ढग पिसारा पसरून उभे ठाकायचे आणि क्षणात पाऊस सुरू व्हायचा. एखाद्या झाडाखाली उभं राहून अर्धवट भिजत त्या पावसाला आलिंगन द्यायचे तेव्हा अंगभर पसरलेला तो ओला शहरा किती हवाहवासा वाटायचा! उघडय़ा रानात झिम्मा खेळत येणारा तो पाऊस निळ्या रंगात बरसत पुढे पुढे निघून जायचा. आजही बाल मनातली ती पावसाची विविध रूपं आठवतात. काही पकडता येतात आणि काही निसटून जातात.

माझ्यासारखा खटय़ाळ, खोडकर पाऊस मला त्या वयात भेटला… आणि त्याने काय केले सांगू?
कधी पाऊस झाला वेडा,
काय करामती त्याच्या सांगू
कागदाच्या बोटीसंगे, पाण्यामध्ये लागे रांगू
कवितेतून शब्दांच्या माध्यमातून पांढऱया फट्ट पानांवर विविध रंगात साकार होतो तो इंद्रधनुष्याचे रंग घेऊन… आणि ऊन-पावसाचा खेळ सुरू होतो.
ऊन पाऊस खेळत, वाऱयासंगे डोले रान
उंच नभात रेखली, इंद्रधनुष्याची कमान

म्हणूनच मंगेश पाडगावकरांना वेंगुर्ल्याचा पाऊस खास वेगळा भासला असावा… दरवर्षी भेटणाऱया पावसाबरोबर आपणही मोठे होत जातो आणि आपल्याबरोबर पाऊसही वेगळ्या रूपात साकारू लागतो. तारुण्याच्या उंबरठय़ावर भेटलेला पाऊस गुलाबी रंगातच मनात घर करतो. अनेक आठवणीतून तो साद घालतो… कॉलेजच्या वयामध्ये एका मुलाला भेटलेला पाऊस तिला कविता लिहून पत्रातून सांगण्याचा प्रयत्न करतो… माझ्या कवितेतून-
पहिलं वहिलं प्रेम आपलं, पहिलाच गुलाबी पाऊस
कॉलेजच्या बाहेर भेट सखे, नको घरी जाऊस
एका छत्रीत चालताना, भिजलेलं तुला पाहायचंय
गालावरच्या थेंबांना, चुंबून मला घ्यायचंय

चार महिने पावसाळ्यामध्ये कित्येक गोष्टी अनुभवायला मिळतात. त्या घटनांचे अवलोकन करताना रौद्र रूपातला पाऊस मनाला सैरभैर करणारा असतो. कधी वीज पडून माणसं मरतात तर कधी इमारत कोसळते. अनेक वेळा घरात पाणी शिरते आणि पाऊस त्यांचे संसार वाहून घेऊन जातो. अशा वेळेला कुसुमाग्रजांची ‘कणा’ कविता आठवल्यावाचून राहत नाही. पाऊस सिमेंटच्या जंगलामध्ये येऊन मिसळतो आणि माणसांच्या जगण्याच्या आरपार घेऊन जातो. बरं, तो सर्वांनाच हवासा वाटतो असंही नाही. अनेकांना पाऊस नकोसाही वाटतो. जेव्हा तो अतिरेक करतो तेव्हा त्याचा रागही येतो. इंदिरा संत त्यांच्या एका कवितेतून पावसाला म्हणतात-

नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी, आणि दारात सायली…
नको नाचू तडातडा, असा कौलारावरून
तांबे-सतेली-पातेली, आणू भांडी मी कोठून?

माणसाला त्रस्त करणाऱया पावसामुळे उद्भवणाऱया काही घटना मनाला त्रस्त करतात. तरीही उन्हाळ्याचा उकाडा वाढला की पाऊस हवाहवासा वाटू लागतो. पावसाचा ओला गारवा मनाला सुखावून जातो. तेव्हा पाऊस प्रिय वाटू लागतो. पावसाचा आणखी वेगळ्या दृष्टीने विचार केला की तो अलौकिकाच्या पातळीवर घेऊन जातो तेव्हा तो मला कधी धरित्रीचा प्रियकर वाटतो तर कधी राधेचा कृष्ण…

अशाच आशय व्यक्त करणाऱया ओळी…
सांज पावसाळी ओली, गर्दी विचारांची दाटे
सावळ्या त्या रंगाची, आर्त आर्त ओढ वाटे

अशा वेळेला नेत्र माझे राधेचे होतात आणि कृष्णाच्या बासरीतून पावसाच्या सरी बरसू लागतात. पावसाला एक विशिष्ट नाद असतो, लय असते आणि शांतपणे डोळे मिटवून त्या नादामध्ये जेव्हा आपण एकरूप होऊन जातो तेव्हा तो पाऊस अलौकिक आनंद देतो. एकदा पावसाळ्यात लोणावळ्याला फिरायला गेले. संध्याकाळची वेळ होती आणि पावसाला सुरुवात झाली. अशा वेळेला जेव्हा ढग दाटून येतात तेव्हा मनाला हुरहुर लावणारा पाऊस आठवांचा पिंगा घालू लागतो. तो पाऊस वेगळाच… या वयात पहिला पाऊस आला की वाटायचं, धरतीची आठ महिन्यांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि त्यांच्या भेटीतला तो क्षण शब्दांच्या थेंबांमधून मनाला चिंब करून जातो. मग आठवते ती वाट पाहणारी धरती. मला ती माझ्यासारखी वाटू लागते. तिच्यातला तो मुक्त सुगंध मन भरून घेताना शरीर सुगंधित करतो… आणि तो सुगंध संवेदनांना मोहित करतो. त्या वेळेला शब्द आपोआप अंकुरतात आणि खालील ओळी प्रगट होतात-

झाकळले नभ काळे आठवणीत रेंगाळले
उष्ण श्वासात सरीच्या क्षण प्रेमाचे पेरले

पन्नाशीनंतर भेटलेला पाऊस तो अशी विचारांची पेरणी करत पावसाच्या सरींबरोबर मशागत केलेल्या मनाच्या जमिनीत सुरू होते. तेव्हा जाणवू लागते उन्हाने तप्त झालेली धरित्रीची भेगाळलेली काया आणि आर्तपणे घातलेली साद, ती ऐकून मला तिची ती अवस्था पाहवत नाही. या वेळेला ती मला विरहिणीच्या रूपामध्ये जाणवते आणि मलाही त्याला विनंती करावीशी वाटते….

डोळे उघड पावसा, ऐक माझं तू सांगनं
पहा जरा भुईकडं टाहो फोडते जमीन
तळे पाण्याचे कोरडे तळपते रानात
डोळे आभाळी टांगले, काया पेटली उन्हात
ती आर्त हाक ऐकून त्याला यावंच लागतं. तो येतो आणि ती पुलकित होते आणि म्हणते…
तू दरवर्षी येतोस
अन् मिटलेल्या आठवणींचे बीज
रुजवून जातोस
पानगळीत पडलेल्या मनाला
परत अंकुरण्यासाठी, तुला यावंच लागतं

असं हे दोघांचं नातं. माझ्या कवी मनाला नेहमी या ना त्या रूपात जाणवतं. कधी मला ती राधेसारखी विरहिणी वाटते…तेव्हा तिच्या मनातील ती विरहाची हलचल मला अस्वस्थ करते… सावळ्या ढगाकडे पाहून तिला काय वाटतं याचा मी अंदाज घेऊ लागते…
ढग सावळा दिसला अवचित,
अन् बासुरीची आली धून
सावरून तिने वरती पाहिले,
क्षणात चांदणे झाले ऊन

कधी ती सती पार्वतीसारखी निर्मोही जाणवते तेव्हा पाऊस शंकर भोळा वाटतो आणि या माझ्याच मनाच्या सुप्त असुप्त अवस्था मी यांच्या रूपाने कवितेत अधोरेखित करते. धरती आणि पावसाचा तो मिलनाचा सोहळा मला अप्रूप वाटतो. आणि चार महिन्यांनंतर जेव्हा तो निघून जातो तेव्हा तो पाठीमागेही वळून पाहत नाही. तेव्हा पाऊस बेफिकीर पुरुषासारखा भासतो… माझ्या लेखणीतून माझ्याही नकळत खालील ओळी प्रकटतात..
मन कोवळे गेले करपुनी,
कुणी सांगा त्या फकिराला
धरती, पार्वती, राधा, मीच,
कळेल का कधी त्या पुरुषजातीला?
माझी कविता माझ्याबरोबरच प्रगल्भ झालेली मला जाणवते. आणि कवितेचं आणि पावसाचं नातं दृढ होत जातं. मुंबईच्या महानगरामध्ये भेटलेला पाऊस हा वेगळाच गावाकडून मुंबईपर्यंत येऊन तो जेव्हा थकतो आणि समुद्रकिनाऱयावर फिरायला जातो तेव्हा तिथलं रोमँटिक वातावरण पाहून तोही तिथेच रमतो आणि समुद्रात समुद्राच्या लाटांवर त्याचा नाच सुरू होतो.
पावसाळ्यात कधीतरी गावी जाते तेव्हा ओली चूल, भिजलेली लाकडं आणि स्वयंपाक करताना धुपणाऱया चुलीपाशी डोळे चोळीत बसलेली शेतकऱयाची बायको दिसते. तेव्हा वाटतं की पावसाविषयी काही विचार करत असेल… शेतकऱयाच्या बायकोला भेटलेला पाऊस तिचं मनोगत सांगत माझ्या लेखणीतून साकारतो-
ती पावसाला म्हणते…
पुरे झालं रे पावसा जा दुसऱया गावाला
पेटं ना ओली चूल काय देऊ मी खायाला
संध्याकाळ उलटून गेली तरी पाऊस थांबत नाही तेव्हा तिची काळजी वाटते, कारण तिचा घरधनी अजून शेतातून घरी आलेला नसतो.
नको येऊ रे पावसा, ओढा पाण्याने भरला
घरधनी माझा नाही अजून आला घरला
अशी कितीतरी रूपं पावसाची आजवर मी न्याहाळत आले आहे. लहानपणीचा पाऊस आजही मला आठवतो तो… शाळेच्या पत्र्यावर पाय आदळत तडतड आवाज करणारा. अंगणातल्या तळ्यामध्ये कागदांच्या बोटी सोडताना हळुवारपणे अंगावर बरसणारा. लहान मुलांसारखाच जरासा अवखळ, थोडासा खटय़ाळ असाच असायचा तो. येरे येरे पावसा म्हणत त्याला पैशाचं आमिष दाखवल्यानंतर येणारा पाऊस किती अप्रुप वाटायचा. पावसाची रीप रीप सुरू असली की तो मातीत मिसळून जायचा. तेव्हा मातीत खेळून मळलेल्या बाळासारखा तो निरागस दिसायचा. येथे मला नलेश पाटील यांच्या कवितेतील दोन ओळी आठवतात-
पावसाचं अंग मातकट रंगलेलं
इंद्रधनुष्याला मात्र नभीं टांगलेलं…
मला वाटतं ज्या पंचमहाभूतांपासून ही सृष्टी निर्माण झाली आहे त्याच पंचमहाभूतांपासून मानवाचीही निर्मिती झाली आहे, त्यामुळे निसर्ग आणि मानवाचं नातं हे अतूट आहे. म्हणून प्रत्येक पावसाळ्यात मला पाऊस भेटतो तो सुजन सकाळच्या रूपात.
> [email protected]