इंडिया आघाडीच्या प्रचाराचा शंखनाद शिवतीर्थावरून, राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या सांगतेचा मुहूर्त

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा 12 मार्चला महाराष्ट्रात प्रवेश करणार असून 17 मार्चला दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर या यात्रेची सांगता होणार आहे. याचवेळी ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे. त्यानिमित्त संपूर्ण मुंबई तिरंगामय करण्याचे निर्देश काँग्रेस पक्षश्रेष्ठाRनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबार येथून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. त्या यात्रेच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत आज काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, बंटी पाटील, वर्षा गायकवाड, चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप, डॉ. अमरजितसिंह मनहास आदी उपस्थित होते. 17 मार्चला न्याय यात्रेच्या सांगता सभेला काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांचे नेतेही उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

सभेला पालिकेची परवानगी
इंडिया आघाडीच्या 17 मार्च रोजी होणाऱया सभेसाठी पालिकेने परवानगी दिली आहे. या सभेसाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान उपलब्ध करून देण्यासाठी काँग्रेसकडून अर्ज दाखल करण्यात आला होता. सभेला परवानगी देण्यात आली असली तरी उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटी-शर्तींचे पालन करावे, आवाजाच्या मर्यादा पाळाव्यात, शासन निर्णय पाळावेत आणि आवश्यक तिथे पोलिसांची परवानगी घ्यावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला तुफान प्रतिसाद मिळत असून आज गुरुवारी या यात्रेने मध्य प्रदेश, राजस्थान असा प्रवास करत गुजरातमध्ये प्रवेश केला. राहुल गांधी पुढचे तीन दिवस गुजरातमध्ये असणार आहेत. आज सायंकाळी राजस्थान-गुजरात सीमेवरील दाहोद जिह्यातील झालोद येथून यात्रेला सुरुवात झाली असून ते राज्यात 400 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. त्यानंतर 10 मार्चला यात्रा महाराष्ट्रातील नंदूरबारमध्ये प्रवेश करेल.