जय श्री राम बोला आणि उपाशी मरा! राहुल गांधी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका

काँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला पुन्हा मंगळवारी मध्य प्रदेश राज्यातील सारंगपूर येथून सुरुवात झाली. नागरिकांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बेरोजगारीच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली आहे.

जेव्हा राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सारंगपूरमध्ये दाखल झाली तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी “मोदी मोदी” आणि “जय श्री राम” च्या घोषणा दिल्या. भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणांचे राहुल गांधी यांनी स्वागत केले आणि देशातील बेरोजगारीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, बेरोजगार तरुण मोबाईलवर रील पाहण्यात दिवस घालवत आहेत. पंतप्रधानांची सुद्धा तीच इच्छा आहे. तरुणांनी आपला वेळ मोबाईलमध्ये घालवावा आणि जय श्री रामचा जप करावा आणि उपाशी मरावे, अशी टीका राहुल गांधी यांनी यावेळी केली.

तसेच अग्निवीर योजनेवरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले, योजनेपूर्वी तरुणांना पेन्शन दिली जायची आणि त्यांना वीरमरण आले तर त्यांचा सन्मान केला जायचा. ते पुढे म्हणाले की, आता अग्निवीर योजना लागू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत चार तरुणांना सामावून घेतले जाईल. या चौघांपैकी तीन जणांना मुक्त केले जाईल आणि हे तीन जण एससी (SC), एसटी (ST) आणि ओबीसी (OBC) समाजातील असतील.

पाकिस्तानच्या तुलनेत हिंदुस्थानात दुप्पट बेरोजगारी आहे. हिंदुस्थानात 23 टक्के आणि पाकिस्तानात 12 टक्के बेरोजगारी आहे. रविवारी ग्वाल्हेरमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी बेरोजगारीचा मुद्धा उपस्थित केला होता. तसेच हिंदुस्थानातील बेरोजगारीचा दर मागील 40 वर्षांतील सर्वाधिक असून देशातील बेरोजगार तरुणांची संख्या बांग्लादेश आणि भूतानच्या तुलनेत जास्त असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.