खुनाच्या आरोपीसोबत दुचाकीवर बसून सुजय विखे यांचा प्रचार, व्हिडीओ व्हायरल

नारायण गव्हाण येथील संतोष बबन गायकवाड यांच्या हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी अजिंक्यतारा दरेकर याच्या दुचाकीवर बसून खा. डॉ. सुजय विखे हे रॅलीत सहभागी झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या रॅलीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दरम्यान संतोष गायकवाड यांच्या पत्नी सुरेखा गायकवाड यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला असून आपल्याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

शनिवार दि. 13 एप्रिल रोजी सुजय विखे यांच्या प्रचारासाठी नारायण गव्हाण परीसरात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या ठिकाणी जाताना काढण्यात आलेल्या रॅलीत खासदार डॉ. सुजय विखे हे अजिंक्यतारा दरेकर याच्या दुचाकीवर बसलेले होते.

”मागासवर्गीय समाजावर होणारा अन्याय दुर करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायद्याचे ज्ञान घेतले. अन्यायाविरूध्द लढा दिला. त्यांच्या या लढयाचा आज काही उपयोग होत नसल्याचे दिसत आहे. माझ्या पतीची हत्या झाल्यानंतर त्यांचे मारेकरी काही दिवसांतच कोठडीबाहेर आले. ते आज मोकाट फिरत आहेत. त्यांना राजकारणी लोकांचा पाठींबा आहे हे पाहून अतिशय वाईट वाटते. आज माझे सासू सासरे अंथरूणाला खिळलेले आहेत. पतीची हत्या झाल्यानंतर आमच्यापुढे मोठे संकट उभे असतानाच पतीच्या मारेकऱ्यांपासून आमच्या कुटुंबाला धोका आहे. या आरोपींना तडीपार करण्यात यावे. त्यांना मदत करणाऱ्या राजकीय पुढाकाऱ्यांनाही तडीपार करावे. राहुल शिंदे पाटील हे या आरोपींना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करीत आहेत. शिंदे पाटलांचीही चौकशी करून कारवाईची करण्यात यावी, अशी मागणी सुरेखा गायकवाड यांनी केली आहे.

मारेकऱ्याच्या खांद्यावर खासदारांचा हात

माझ्या पतीची हत्या करणारे गुंड मोकाट आहेत. खासदार साहेब त्यांच्या खांद्यावर हात ठेऊन फिरत आहेत. बाबासाहेब आम्हाला कोणी वाली राहिला नाही. बाबासाहेब तुम्ही परत या, मला न्याय द्या भावनिक साद यावेळी सुरेखा गायकवाड यांनी घातली.

काय आहे प्रकरण ?

दि. 22 जुन 2023 रोजी संतोष गायकवाड हे नगर-पुणे महामार्गावरून रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पारनेर फाटयावरून नारायण गव्हाणकडे येत असताना तिघांनी संतोष यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून त्यांची हत्या केली होती. या गुन्हयात अजिंक्यतारा दरेकर याच्यासह नऊ जणांविरोधात सुपा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. सध्या या आरोपींची जामीनावर सुटका झालेली आहे.