भाजपचा पदाधिकारी निघाला तोतया टीसी! संशय येताच रेल्वेने घेतले ताब्यात

 दिंडोशी विधानसभेतील भाजपचा युवा पदाधिकारी हरिओम सिंग हा तोतया टीसी बनून प्रवाशांकडून पैसे उकळत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वेचे मुख्य तिकीट निरीक्षक प्रमोद एच. सरगईया यांनी संशय येताच त्याला रंगेहाथ पकडत कारवाई केली. यावेळी केलेल्या चौकशीत त्याच्याकडे रेल्वेच्या बोगस ओळखपत्राबरोबरच भाजपचा युवा पदाधिकारी असल्याबाबतचे ओळखपत्र आढळून आले आहे. त्यामुळे रेल्वे अधिकाऱयांच्या भुवया उंचावल्या आहेत.

लोकल गाडय़ांच्या फर्स्ट क्लास डब्यामध्ये विनातिकीट प्रवास करणाऱयांचे प्रमाण वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून डब्यांमध्येही तिकीट तपासणी केली जात आहे. दरम्यान, दिंडोशी विधानसभेतील हरिओम सिंग या भाजपच्या युथ पदाधिकाऱयाने आपण टीसी असल्याचे भासवत प्रवाशांचे तिकीट तपासण्याचा सपाटा लावला असून त्यामधून कमाई करत आहे. गुरुवारी कसारा-सीएसएमटी या गाडीच्या फर्स्ट क्लास डब्यात तो तिकीट तपासणी करत असताना मुख्य तिकीट निरीक्षकांनी त्याला पकडून दिवा स्थानकात उतरवून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी केलेल्या तपासणीत त्याने आपण भाजप पदाधिकारी असल्याचे सांगत दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याच्याकडून रेल्वेचे बोगस ओळखपत्र, भाजप पदाधिकारी असल्याचे ओळखपत्र ताब्यात घेत गुन्हा दाखल केल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.