एकाचवेळी दोन जिल्हा परिषदांत नोकरी; डॉ. ढवळेंविरोधात फसवणुकीचा गुन्हा

पारनेर तालुक्यातील वडझिरे येथील समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजश्री ढवळे यांनी एकाचवेळी नगर व पुणे जिल्हा परिषदांच्या वेगवेगळ्या आरोग्य केंद्रांत सेवा बजावल्याचे दाखवून दोन्ही ठिकाणचे मानधन हडपण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डॉ. ढवळे यांच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडझिरेचे सरपंच नीलेश केदारी व ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.

अळकुटी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. संदीप देठे यांनी फिर्याद दाखल केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, पिंपळवंडी (जुन्नर, पुणे) येथे वैद्यकीय अधिकारी पदावर कर्तव्य बजावत असताना डॉ. तेजश्री ढवळे यांनी जून 2021 मध्ये शासनाकडून 40 हजार रुपये मानधन घेतले आहे. त्याच महिन्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, अळकुटी (पारनेर) अंतर्गत समुदाय अधिकारी म्हणून वडझिरे येथे 33 हजार रुपये मानधन घेतले. एकाचवेळी दोन ठिकाणी शासकीय नोकरी करून दोन्ही ठिकाणचे मानधन घेऊन शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, डॉ. ढवळे यांनी शासनाची फसवणूक करण्याबरोबर कोरोना संसर्गकाळात रुग्णांशी प्रतारणा केली असल्याची तक्रार वडझिरे ग्रामस्थांनी नगर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व पारनेर पोलिसांकडे केली होती. या तक्रारीची चौकशी केल्यानंतर डॉ. ढवळे यांनी दोन ठिकाणी नोकरी स्वीकारली असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी डॉ. ढवळे यांची सेवा समाप्त केली.