लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाच्या अखिलाडू वृत्तीचा विजय, स्टोक्सची शतकी झुंज अपयशी ठरली

एकीकडे कसोटीला रंगतदार करण्यासाठी ‘बॅझबॉल’वृत्तीचे धाडस करणारा यजमान संघ ऑस्ट्रेलियाच्या अखिलाडू वृत्तीसमोर हरला. कर्णधार बेन स्टोक्सच्या झुंजार शतकी खेळीमुळे थरारक झालेल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा दुसरा डाव 327 धावांवर संपुष्टात आणला आणि लॉर्ड्स कसोटीतही आपली दादागिरी दाखवली. ऑस्ट्रेलियाने दुसरी कसोटी 43 धावांनी जिंकत पाच कसोटी सामन्यांच्या ‘अॅशेस’ मालिकेत 2-0 अशी जबरदस्त आघाडी घेतली.

आजचा कसोटीचा शेवटचा दिवस ऑस्ट्रेलियाची अखिलाडू वृत्ती आणि बेन स्टोक्सची झुंजार आणि आक्रमक खेळीने गाजवला. शनिवारच्या 4 बाद 114 या धावसंख्येवर अडकलेल्या इंग्लंडला कसोटी विजयासाठी 257 धावांचे जबर आव्हान गाठायचे होते. कसोटीवर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व होते, पण शनिवारच्या नाबाद बेन जोडीने शतकी भागी रचून इंग्लंडला सामन्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. वैयक्तिक 50 धावांवर बेन डकेटचा स्टार्कने टिपलेला झेलही वादात सापडला होता, डकेटने तर बाद समजून मैदानही सोडले होते, पण तिसऱ्या पंचांनी त्याला नाबाद ठरवले. पाचव्या विकेटसाठी 132 धावांची भागी रचल्यानंतरही जोडी फुटली. तेव्हा इंग्लंड विजयापासून 194 धावा दूर होता. बेन स्टोक्सच्या साथीने जॉनी बेअरस्टॉ खेळपट्टीवर पाय रोवण्याचा प्रयत्न करीत होता, पण तेव्हाच मैदानात अखिलाडू वृत्तीचे दर्शन झाले.

बेन स्टोक्सची षटकारांची बरसात

बेअरस्टॉचे बाद होणे इंग्लंडसाठी एक जबर धक्काच होता. इंग्लंडला विजयासाठी 178 धावांची गरज होती. खेळपट्टीवर एकटा स्टोक्स उभा होता. त्याने 126 चेंडूंत 62 धावा केल्या होत्या. सामना जवळजवळ ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकला होता. तेव्हा स्टोक्स जिंकू किंवा मरू हे धोरण अवलंबत ऑस्ट्रेलियावर अक्षरशः तुटून पडला. त्याने ब्रॉडसह 108 धावांची भागी रचत ऑस्ट्रेलियाला दिवसा तारे दाखवले. स्टोक्सने चौकार नव्हे, तर षटकारांचा वर्षाव करत आपले शतक साजरे केले. पण विजयापासून 70 धावा दूर असतानाही ही जोडी फुटली आणि इंग्लंडच्या काळजात धस्स झालं. 9 षटकार आणि तितकेच चौकार ठोकत स्टोक्सची 155 धावांची झुंज हेझलवूडने संपवली. तेव्हाच ऑस्ट्रेलियाने कसोटी जिंकली होती, पण उर्वरित तीन फलंदाजांना बाद करत ऑस्ट्रेलियाने 327 धावांवर यजमानांचा दुसरा डाव संपुष्टात आणला.

ऑस्ट्रेलियाच्या अखिलाडू वृत्तीने जॉनी बेअरस्टॉ बाद

52 व्या षटकातील अखेरचा चेंडू पॅमेरून ग्रीनने बाऊन्सर टाकला. जो बेअरस्टॉने खाली वाकत सोडून दिला. षटक संपलेले असल्यामुळे बेअरस्टॉने एका सेपंदातच क्रीझ सोडले. तेव्हा यष्टिरक्षक अॅलेक्स पॅरीने आपल्या हातातला चेंडू स्टम्पवर मारला आणि पंचांकडे तो स्टंपिंग असल्याची दाद मागितली. आयसीसीच्या नियमानुसार पॅरीच्या हातातला चेंडू डेड झाला नव्हता आणि त्याने तो स्टम्पवर मारल्यामुळे तिसऱ्या पंचांनी बेअरस्टॉला बाद घोषित केले. पंचांनी नियमाला धरून आपला निर्णय जाहीर केला, पण विजयासाठी हपापलेल्या ऑस्ट्रेलियाच्या अखिलाडू वृत्तीचे दर्शन पाहून लॉर्ड्सवरचे खिलाडू वृत्तीचे प्रेक्षक अक्षरशः खवळले. मुळात पॅरी आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी तिसऱ्या पंचाकडे दाद मागायलाच नको होती, असाच नाराजीचा सूर अवघ्या क्रिकेटविश्वातून निघाला आणि सर्वांनीच ऑस्ट्रेलियाच्या अखिलाडू वृत्तीवर जोरदार टीका केली.