माण, खटावच्या प्रश्नांच्या चर्चेसाठी ‘जलनायकांनी’च तारीख ठरवावी; पाणी संघर्ष समितीचे आमदार गोरे यांना आव्हान

खटाव, माण तालुक्यांच्या शेती प्रश्नासंदर्भात आत्तापर्यंत कोणी काय प्रयत्न केला, या चर्चेसाठी स्वतःला ‘जलनायक’ म्हणून घेणाऱ्या आमदार जयकुमार गोरे यांनीच तारीख व वेळ निश्चित करावी. हवे तर आम्ही माण तालुक्यात येऊन एका व्यासपीठावर चर्चा करण्यासाठी तयार आहोत, असे प्रतिआव्हान खटाव तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने आमदार गोरे यांना देण्यात आले आहे.

येरळा नदी प्रवाहित करून येरळवाडी धरणात पाणीसाठा करावा, या मागणीसाठी खटाव तालुका पाणी संघर्ष समिती व सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या वतीने येथे गेल्या आठवडय़ात बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर खटाव तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख, निमंत्रक विजय शिंदे, स्वाभिमानीचे राज्य प्रवत्ते अनिल पवार, डॉ. महेश गुरव, तानाजी देशमुख, तानाजी वायदंडे यांनी आंदोलकांच्या वतीने भूमिका मांडली.

अनिल पवार म्हणाले, खटाव तालुक्याला उरमोडीचे पाणी जयकुमार गोरे हे आमदार होण्यापूर्वीपासून येत आहे. त्यांच्या नाकर्तेपणामुळे तारळीचे धरण होऊनसुद्धा अजून पाणी मिळत नाही. खटाव तालुक्याला ते सापत्न वागणूक देतात हे त्यांच्या कर्तृत्वातून सिद्ध झाले आहे. खटावच्या पाणीप्रश्नाबाबत खटाव तालुका पाणी संघर्ष समितीने पुकारलेल्या आंदोलनाला यश आल्यानेच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

विजय शिंदे म्हणाले, आम्ही आंदोलन केले म्हणूनच पीक नुकसान भरपाई अनुदानाचा कोटय़वधी रुपयांचा घोटाळा, पंचायत समितीमध्ये ‘आपले सरकार’मध्ये झालेला 45 लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. तसेच आंदोलकांची बदनामी करणे अथवा दमदाटी करून चळवळ मोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला, तर ‘जशास तसे’ उत्तर दिले जाईल. मराठा आंदोलकांची चेष्टा केलेल्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशाराही दिला.

यावेळी रणजितसिंह देशमुख, तानाजी देशमुख, डॉ. महेश गुरव, नगरसेवक अमय देशमुख, माजी उपनगराध्यक्ष संदीप गोडसे, योगेश जाधव, दत्तूकाका घार्गे, डॉ. महेश माने, धनंजय काळे आदींची मनोगते झाली.

यावेळी संदीप मांडवे, मकरंद बोडके, शिवसेनेचे शहाजीराजे गोडसे, रासपचे श्रीकांत देवकर, वंचितचे तुषार बैले, गणेश भोसले, अमरजित कांबळे, सूर्यमान जाधव, प्रा. जयंत खराडे, प्रमोद फावडे, सत्यवान कांबळे, महेश गोडसे, धनाजी चव्हाण, परेश जाधव, दाऊद मुल्ला आदी उपस्थित होते.