व्यभिचारी पत्नीला पोटगी मागण्याचा अधिकार नाही, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

karnataka-high-court

विवाहबाह्य संबंध ठेवणारी पत्नी आपल्या पतीकडून पोटगी मागू शकत नाही, असं कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. एका पुनर्विचार याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही स्पष्टोक्ती केली आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती राजेंद्र बदामीकर यांच्या एकलपीठासमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली. या प्रकरणातील पत्नीने घटस्फोटानंतर पोटगी मिळावी म्हणून उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. दंडाधिकारी न्यायालयाने पोटगी आदेश नाकारल्याने ती मिळावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.

विवाहित पत्नी म्हणून आपल्याला पोटगी द्यावी हा अधिकार आणि पतीचं कर्तव्य आहे, असा युक्तिवाद केला होता. तर पतीने तिच्यावर विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप केले होते. पत्नी शेजाऱ्यासह पळून गेली होती आणि तिने त्याच्यासोबत राहयला नकार देत प्रियकरासोबत राहणं पसंत केलं होतं. जरीही ती विवाहित पत्नी असली तरीही तिची वागणूक आणि विवाहबाह्य संबंध यांमुळे तिला पोटगी मागण्याचा अधिकार नाही, असा युक्तिवाद पतीतर्फे करण्यात आला.

त्यावेळी पतीचा युक्तिवाद उच्च न्यायालयाने ग्राह्य मानला. याचिकाकर्तीने जरी हा दावा केला की ती कायदेशीररित्या विवाहित आहे आणि पोटगीचा अधिकार मिळवू शकत असेल, तरीही तिचं आचरण पाहता हे स्वीकारार्ह नाही. जर तिला पोटगी हवी असेल तर तिने आपण या विवाहात प्रामाणिक असल्याचं सिद्ध करावं. आणि जर ती स्वतः प्रामाणिक नसेल तर ती नवऱ्यावर आरोप करू शकत नाहीच, शिवाय पोटगी मागण्याचाही तिला काहीही अधिकार नाही, असं कर्नाटक उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.