राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात येणार; काँग्रेसकडून जय्यत तयारी

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर काँग्रेसची भारत न्याय जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा मंगळवारी महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. ही यात्रा मणिपूरपासून सुरू झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील या यात्रेचे नंदुरबारमध्ये जोरदार स्वागत करण्याची तयारी प्रदेश काँग्रेसने केली आहे.

भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात 15 जानेवारीला मणिपूरमधून करण्यात आली. ही यात्रा 15 राज्ये, 100 जिल्हे, 110 लोकसभा मतदारसंघातून ‘भारत जोडो न्याय यात्रा, न्याय का हक मिलने तक’ या घोषवाक्यासह मार्गक्रमण करीत आहे. यात्रेचा मंगळवारी दुपारी 2 वाजता नंदूरबार जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. त्यानंतर 13 मार्चला धुळे, मालेगाव, 14 मार्चला नाशिक, 15 मार्च रोजी पालघर, ठाणे असा प्रवास करत ही यात्रा 16 मार्च रोजी मुंबईत दाखल होणार आहे. 17 मार्चला भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कवर होणार आहे. यावेळी होणाऱ्या जाहीर सभेने लोकसभा निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

भारत जोडो न्याय यात्रेसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने जय्यत तयारी केली असून मुंबईत राहुल गांधी व न्याय यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. रविवारी, १७ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेला इंडिया आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाची शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आलेली जाहीर सभा, तसेच राहुल गांधी यांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवर, वर्षां गायकवाड यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.