लोकविधा – दिवाळीचा पहिला दिवस भामेचा, स्त्रीशक्तीचा…

>> डॉ. मुकुंद कुळे

राधेची प्रेमालाच विश्वाकार देण्याइतकी झेप सत्यभामेची नव्हती किंवा दुसऱयाच्या खुशीतच आपला आनंद मानण्याचा रुक्मिणीसारखा समंजसपणा वा मनाचा मोठेपणाही सत्यभामेपाशी नव्हता, पण म्हणून तिचं कृष्णावरचं प्रेम उथळ किंवा कृत्रिम नव्हतं. आपल्या प्रेमाला सोशीकपणाचा, समंजसपणाचा किंबहुना त्यापलीकडे जाऊन कुठल्याही भोगापलीकडचा साज चढवणं तिला नसेल जमलं कदाचित! पण प्रेमासाठी, आपल्या प्रिय माणसासाठी आपल्या आयुष्याचा स्वाहाकार करण्याची ताकद नक्कीच होती तिच्या प्रेमात.

सत्यभामा… राधेसारखंच उन्मनी प्रेम होतं तिचं कृष्णावर, पण राधेनं कधी कृष्णाला आपल्या पदराला बांधून ठेवायचा प्रयत्न केला नाही. कारण कृष्णाचं अस्तित्व वेगळं असलं तरी तो आपल्याहून भिन्न नाही हे तिला माहीत होतं. आपण म्हणजेच कृष्ण आणि कृष्ण म्हणजेच आपण हे परस्परांतलं अभिन्नत्व तिने जाणलं होतं. राधेची ही प्रेमालाच विश्वाकार देण्याइतकी झेप तिची नव्हती किंवा दुसऱयाच्या खुशीतच आपला आनंद मानण्याचा रुक्मिणीसारखा समंजसपणा वा मनाचा मोठेपणाही तिच्यापाशी नव्हता, पण म्हणून तिचं कृष्णावरचं प्रेम उथळ किंवा कृत्रिम नव्हतं. आपल्या प्रेमाला सोशीकपणाचा, समंजसपणाचा किंबहुना त्यापलीकडे जाऊन कुठल्याही भोगापलीकडचा साज चढवणं तिला नसेल जमलं कदाचित! पण प्रेमासाठी, आपल्या प्रिय माणसासाठी आपल्या आयुष्याचा स्वाहाकार करण्याची ताकद नक्कीच होती तिच्या प्रेमात. समजून उमजून विचारांती केलेलं, त्यागपूर्ण व औदार्यपूर्ण प्रेम मोठं असेलही; पण आपल्या जिवाची आहुती देण्याची ताकद, आपल्या प्रियकराविरुद्ध उभ्या ठाकलेल्या शत्रूशी लढण्याची ताकद फक्त काहीशा उथळ प्रेमातच असते. कारण या अवस्थेतच प्रेमासाठी मरण्याची मिटण्याची इच्छा सगळ्यात जास्त प्रबळ असते.

कृष्णाला हे ठाऊक होतं बहुधा. म्हणूनच नरकासुराशी लढायला जाताना त्याने आपली पट्टराणी असलेल्या रुक्मिणीला नाही नेलं बरोबर. त्याने भामेला म्हणजे सत्यभामेलाच घेतलं बरोबर. कारण तिच्या प्रेमाची ताकद त्याला ठाऊक होती. ती जेवढी सर्जनशील आहे, तेवढीच संहारक हे तो नक्की जाणून होता. जिथे प्रेमाचा अतिरेक आहे, तिथेच टोकाची क्रूरता असते हे तो उमगून होता…

…आणि तसंच झालं. ब्रह्मदेवाने दिलेल्या वरामुळे उन्मत्त झालेला नरकासुर कृष्णालाही भारी पडायला लागला तेव्हा भामेनेच घेतली युद्धाची सारी सूत्रं आपल्या हातात. नरकासुराने त्याच्याकडची दिव्यशक्ती सोडली कृष्णावर तेव्हा तर इतर देवही घाबरले क्षणभर. कारण त्या दिव्यशक्तीची ताकद देवगणाला ठाऊक होती. किंबहुना कृष्णाचाही त्या दिव्यशक्तीपुढे निभाव लागेल की नाही याविषयीदेखील ते साशंकच होते. मात्र इतर देवांनाच कशाला, खुद्द कृष्णालाही ते अवगत असावं की, नरकासुरासमोर आपला टिकाव लागणं अशक्य आहे. म्हणून तर त्याने आपल्या प्रेयसीला भामेला घेतलं होतं बरोबर. मग भामेनेही आपली निवड सार्थ ठरवली. नरकासुराने त्याच्याकडची दिव्यशक्ती सोडताच कृष्णही डगमगलाच, अगदी हतबल झाला, पण सत्यभामा निडरपणे उभी राहिली त्या शक्तीपुढे आणि तिने सामावून घेतलं त्या शक्तीला आपल्याच देहात. जणू एक शक्ती दुसऱया शक्तीत विलीन झाली. आपली दिव्यशक्ती सत्यभामेनं अशी सहजच पचवल्याचं बघितलं अन् तिथेच नरकासुराचा शक्तिपात झाला. त्यानंतरच कृष्णाने आपलं सारं बळ एकवटून आपल्या सुदर्शन चक्राने नरकासुराचा वध केला. मात्र भामा होती बरोबर म्हणूनच नरकासुराला मारणं सहजशक्य झालं कृष्णाला.

…अन् तरीही सत्यभामा म्हणजे कृष्णाकडे पारिजातकाच्या फुलाचा हट्ट करणारी अन् कृष्णाला नारदाला विकायला निघालेली वेडीच वाटते साऱ्यांना, पण सत्राजित राजाची लाडकी लेक असलेली सत्यभामा खरंच वेंधळी होती? पुराणांनी तरी तिचं चित्र तसंच रंगवलंय. सौंदर्याचा अभिमान असलेली आणि कृष्णाची लाडावलेली राणी म्हणून. त्यात पारिजातकाची आणि कृष्णाच्या तुलेची कथा तिच्या चरित्राला चिकटवून तिची किंमत साऱ्यांनी रुक्मिणीच्या तुलनेत अगदीच यथातथा केली.

कथाही काय तर म्हणे नारदाने एकदा पारिजातकाचं एक फूल आणून ते कृष्णाला दिलं. कृष्णाने ते रुक्मिणीला दिलं. मात्र कृष्णाने ते फूल रुक्मिणीला दिल्याचं कळल्यावर सत्यभामा रागावली. तेव्हा तिचा राग घालवण्यासाठी कृष्ण तिला म्हणाला, “तिला फूलच दिलं, तुला अख्खं झाडच आणून देतो.” तसं पारिजातकाचं झाड त्याने आणून सत्यभामेच्या महालाच्या बाहेर लावलंही, पण त्याची फुलं रुक्मिणीच्या आवारात पडायची म्हणे. अगदी लोकगीतांतही याचे संदर्भ सापडतात-
पारिजातकाचं झाड सत्यभामाईच्या घरी
पडती फुलं सारी रखमाईच्या शेजेवरी…
किंवा
पारिजातकाचा बाई
सत्यभामाला काय नफा
रुक्मिणीच्या अंगणात फुलं
पडती टपाटपा…
अशीच दुसरी कथा कृष्णाच्या तुलादानाची. “मला सत्कार्यासाठी द्रव्य हवंय. तू कृष्णाच्या भाराइतकं द्रव्य मला दे अन्यथा मी कृष्णाला चाकर म्हणून घेऊन जाईन,” असं नारदाने सांगताच सत्यभामा खरोखरच निघाली कृष्णाची तुला करायला, पण आपल्याकडचं आणि आपल्या सवतींकडचं सगळं सोनंनाणं आणून भामेने तराजूत टाकलं तरी कृष्णाचं पारडं काही वर जाईना. तेव्हा नारदाने सत्यभामेला रुक्मिणीकडून सोनं आणायला सांगितलं. मात्र रुक्मिणी सोनंनाणं घेऊन न येता एक तुळशीचं पान घेऊन आली. ते पान तिने सोन्यानाण्याच्या पारड्यात टाकलं मात्र. कृष्णाचं पारडं लगेच उचललं गेलं. अगदी या कथेचेही संदर्भ लोकगीतात अलगद सापडतात-
बाई रुक्मिणीपरीस सत्यभामा किती हट्टी
नारदाच्या घरी देव टाकिले घाणवटी…
आणि म्हणून चिडलेली
रुक्मिणी म्हणते कशी-
कशी रुक्मिणी बोलते, अवो सत्यभामाबाई
कसा दानाला दिला पती,
तुमच्या एकलीचा न्हाई…
म्हणजे दोन्ही कथांत रुक्मिणीच सत्यभामेहून सरस ठरलेली दिसते. शेवटी तीच कृष्णाची ज्येष्ठ आणि श्रेष्ठ राणी. चारचौघांत अगदी समजून-उमजून वागणारी, थोरामोठ्यांचा आब राखणारी आणि आपल्या प्रेमळ-सालस स्वभावाने साऱ्यांची मनं जिंकून घेणारी. साहजिकच पुराणं काय किंवा लोकमानस काय, सगळीकडे रुक्मिणीलाच झुकतं माप मिळालेलं दिसतं.
मात्र या दोन्ही कथा खरं तर सत्यभामेच्या एकूणच शूर व्यक्तिमत्त्वावर अन्याय करणाऱ्या आहेत. कारण आपण हट्टाने मागून घेतलेल्या पारिजातकाचं झाड आपल्या दारात आहे, पण त्याची फुलं मात्र दुसरीच्या अंगणात पडतायत हे का भामेला कळलं नसेल किंवा नारदाने “कृष्णाच्या भाराइतकं सोनं दे नाहीतर त्याला माझा गुलाम म्हणून नेतो” म्हटल्यावर हे सारं लुटुपुटुचं आहे हे का तिला उमगलं नसेल?
उमगलं असेलच खरं तर! पण या लुटुपुटुच्या खेळात कदाचित भामाही मुद्दामच सहभागी झाली असेल. क्षात्रतेज घेऊन जन्माला आलेल्या सत्यभामेला हा सारा विरंगुळा तर नसेल वाटला? कदाचित, शेवटी आदिमायाच तर होती ती. खेळायची सवयच होती तिला… जगाबरोबर, माणसांबरोबर, सुष्टदुष्ट शक्तींबरोबर.

आपण कृष्णाने नरकासुराला मारल्याच्या आठवणीप्रीत्यर्थ म्हणून दिवाळीचा पहिला दिवस नरकचतुर्दशी म्हणून साजरा करतो. अगदी नरकासुराचं प्रतीक म्हणून पायाच्या अंगठ्याने कारेटंही फोडतो, पण हा दिवस साजरा करायचाच झाला तर प्रत्यक्षात सत्यभामेच्या परामासाठी साजरा झाला पाहिजे, स्त्रीशक्तीचं प्रतीक म्हणून साजरा झाला पाहिजे. स्त्री म्हणजे जगन्माता-जननी खरीच, पण वेळ येताच ती तिच्यातलं संहारकत्व कसं पणाला लावते ते सत्यभामेच्या या नरकासुराबरोबरच्या युद्धातून समोर येतं. गंमत म्हणजे सत्यभामेचा वेंधळेपणा लोकमानसाने-लोकपरंपरेने रंगवलाच, परंतु तिच्या परामाचीही दखल लोकमानसाने घेतलेली दिसते. हे लोकमानस म्हणतं-
नरकासुराशी लढताना कृष्णदेव आला मागं
त्याची अस्तुरी भामाई, म्हणे लढ माझ्यासंग
नरकासुराची गं शक्ती पडे सगळ्याले भारी
माता सत्यभामाईने कशी बघ पेलली उदरी
एकूण पुराणग्रंथांना सत्यभामेचं मोठेपण आकळलेलं नसलं तरी लोकवाङ्मयाने मात्र तिच्या परामाची बूज राखलेली दिसते. म्हणूनच नरकचतुर्दशी हा दिवाळीचा पहिला दिवस साजरा करायचाच झाला तर तो सत्यभामेच्या परामाची आठवण म्हणूनच साजरा व्हायला हवा!

[email protected]