खोके देऊन स्थापन झालेले राज्यातील सरकार असंवैधानिक, नाना पटोलेंची टीका

राज्यात शिंदेफडणवीस  सरकार स्थापन करताना घेतले गेलेले सर्व निर्णय सर्वोच्च न्यायालयाने  चुकीचे ठरवले आहेत. राजभवनचा गैरवापर करून, आमदारांना ईडी, सीबीआयची भीती घालून खोके देऊन सरकार स्थापन करण्यात आले. हे सरकारच असंवैधानिक आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केली. 

राज्य सरकारच्या वर्षपूर्तीवर नाना पटोले यांनी जोरदार टीका केली. न्यायालयाच्या  निर्णयानंतरही ईडी सरकार खुर्चीला चिकटून बसले आहे, असे नाना पटोले म्हणाले.

शेतकरी संकटात 

वर्षभरात या सरकारने एकही कल्याणकारी निर्णय घेतलेला नाही. जुलै 2022 ते जानेवारी 2023 या सात महिन्यांच्या काळातच राज्यात 1 हजार 23 शेतकऱयांनी आत्महत्या केल्या, तर दर 10 तासांना एक आत्महत्या होत आहे, असा आरोप पटोले यांनी केला. 

राज्यात कुराज्य सरकार 

राज्यात हे असंवैधानिक, असंवेदनशील, भ्रष्ट  कुराज्य असावे असे स्वाभिमानी जनतेला अजिबात वाटत नाही. त्यामुळे हे सरकार लवकरात लवकर जावे हीच जनतेची इच्छा आहे, असेही पटोले  म्हणाले. 

गुन्हेगार मोकाट आणि पोलीस सुस्त

राज्यातील कायदासुव्यवस्था बिघडलेली असून मागील चार महिन्यांत 20 ठिकाणी दंगली घडवून आणल्या. ईडी सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाहीत. मुंबई हे देशात महिलांसाठी सुरक्षित शहर असा नावलौकिक होता,  पण लोकलमध्ये मुलींवर अत्याचार होत आहेत, महिलांच्या हत्या वाढल्या आहेत. राज्यातील चार हजारांपेक्षा जास्त महिला आणि मुली गायब झाल्या आहेत. पुण्यासारख्या शहरातही दिवसाढवळय़ा मुलीवर कोयत्याने हल्ला होतो. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नाही. सहासात विभागाचा कारभार, सहा जिह्यांचे पालकमंत्रीपद आणि  राजकीय साठमारीतून त्यांना गृह विभागाकडे लक्ष देता नाही. सत्ताधारी पक्षाचे आमदार, खासदारच नाही तर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही विरोधकांना जाहीरपणे धमकी देत आहेत. ईडी सरकारच्या काळात गुन्हेगार मोकाट आणि पोलीस प्रशासन सुस्त आहे. केवळ विरोधी पक्षांच्या लोकांवरच कारवाई केली जात आहे, असे नाना पटोले म्हणाले.