भाजपकडून विकृतीला खतपाणी घालण्याचे काम, निखील भामरेला ‘राजाश्रय’ दिल्याने रोहित पवार आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्यावर पातळी सोडून टिका करणाऱ्या नाशिकचा तरुण निखील भामरे यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी सोपवली आहे. भाजपच्या मीडिया सेलच्या सहसंयोजक पदी त्याची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे. तसेच सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवारांची यावर भूमिका काय याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

निखील भामरे याने गेल्या वर्षी शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केले होते. ‘वेळ आली आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची. #बाराचा_काका_माफी_माग’, असे ट्विट त्याने केले होते. यामुळे आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्याच्याविरोधात राज्यभरात गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर त्याला अटकही करण्यात आली होती. जवळपास महिनाभर तो तुरुंगात होता.

विकृतीला खतपाणी घालण्याचे काम

सोशल मीडियात शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या निखिल भामरे याची भाजपकडून सोशल मीडियाचा सहसंयोजक म्हणून नेमणूक केली जाते, म्हणजेच समाजात विकृतीला खतपाणी घालण्याचं काम भाजपच करत असल्याचं स्पष्ट झालंय. समाजात विष कालवणाऱ्या या विकृत कृतीचा तीव्र निषेध, अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच भाजपच्या आणि त्यांच्या #मित्र_पक्षाच्या किती नेत्यांकडून या कृतीला विरोध होतो, हेच आता बघायचंय, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

कार्यकर्त्यांचा संताप

दरम्यान, शरद पवारांवर गरळ ओकणाऱ्या निखील भामरे याला भाजपने अधिकृत पद दिल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांना आपला रोख थेट अजित पवारांकडे वळवला आहे. अजित पवारांमुळेच हे शक्य झाले असून आता तरी तुम्ही शरद पवारांना दैवत म्हणू नका, असे कार्यकर्त्यांनी सोशल मीडिया पोस्ट करून म्हटले आहे.