Share Market News – सरकारी बँकेच्या शेअरने वर्षभरात केले पैसे दुप्पट, तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?

शेअर बाजारामध्ये चांगलीच तेजी असून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी रोज नवनवीन उच्चांक रचत आहे. तेजीमुळे शेअरच्या किंमतीही वाढत असून गुंतवणूकदारांना भरघोस परतावाही मिळतोय. गेल्या वर्षभरात सरकारी कंपन्यांच्या शेअर्सनेही गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. यात सरकारी बँकांचाही समावेश आहे. यापैकीच एका प्रमुख बँकेमधील भागिदारी रेखा झुनझुनवाला यांनी कमी केली आहे.

रेखा झुनझुनवाला या शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आहेत. त्यांनी मार्च महिन्यामध्ये एका सरकारी बँकेतील आणि दुसऱ्या स्मॉलकॅप कंपनीतील आपली भागिदारी कमी केली आहे. विशेष म्हणजे झुनझुनवाला यांनी ज्या सरकारी बँकेतील भागिदारी कमी केली आहे त्या कंपनीच्या शेअरने गेल्या वर्षभरात त्यांचे पैसे दुप्पट केले आहेत.

रेखा झुनझुनवाला यांनी सरकारी मालकी असणाऱ्या कॅनरा बँकेतील आपली भागिदारी 1.45 टक्के केली आहे. याआधी या बँकेमध्ये त्यांची भागिदारी 2.07 टक्के होती. तर दुसरीकडे राघव प्रोडक्टिव्हीटी इनहँसर्स या कंपनीमध्ये त्यांनी आपली भागिदारी घटवली आहे. या कंपनीमध्ये रेखा झुनझुनवाला यांची भागिदारी आधी 5.12 टक्के होती, ती आता त्यांनी 5.06 टक्क्यांपर्यंत आणली आहे.

बुधवारी कॅनरा बँकेचा शेअर 3.80 रुपयांनी वाढला आणि 611.95 रुपयांपर्यंत पोहोचला. या बँकेचे मार्केट कॅपिटलायझेशन 1.11 लाख कोटी रुपये आहे. तर दुसरीकडे राघव प्रोडक्टिव्हीटी इनहँसर्स या कंपनीच्या शेअरमध्ये 0.94 टक्क्यांनी घसरण झाली आणि तो 633 रुपयांवर पोहोचला. या शेअरने गेल्या तीन महिन्यात 15 टक्के, तर गेल्या वर्षी 45 टक्के परतावा दिलेला आहे.

दरम्यान, ट्रेडलाईननुसार मार्च तिमाहीपर्यंत रेखा झुनझुनवाला यांनी 25 शेअरमध्ये गुंतवणूक केली होती. त्यांचा पोर्टफोलिओ 42.253.34 कोटी रुपयांचा होता. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये एनसीसी, टायटन कंपनी, व्हीए टेक वाबॅग, नजारा टेक्नोलॉजीज, मेट्रो ब्रांड, टाटा मोटर्स, टाटा कम्युनिकेशन्स, फोर्टिस हेल्थकेअर सारखे शेअर आहेत.