राष्ट्रावादीच्या एंट्रीमुळे मंत्रिपदावरून ‘वादावादी’; ‘खाते’ वाटपावर मिंधे गट ‘प्रचंड आशावादी’

bharat-gogawale-sanjay-shirsat

मिंधे गटाच्या नेत्यांच्या मनात असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून विचारलेल्या प्रश्नावर मिंधे गटाचे नेते संजय शिरसाट, भरत गोगावले यांनी पत्रकार परिषदेत गोलगोल उत्तरं दिली. मंत्रिमंडळ विस्तार झाला तेव्हा अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या घुसखोरीमुळे मिंधे गटाची चांगलीच गोची झाली. त्यानंतर मिंधे गटात चांगली वादावादी झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र ते प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न केले गेले. मिंधे गटात सारं काही सुरळीत असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. गोलगोल उत्तरातूनही पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि आपल्या वाटेला चांगलं खातं येईल असा ‘प्रचंड आशावाद’ या दोघांनी व्यक्त केला. तरी ‘पालकमंत्रीपद आम्हालाच हवं, अजित पवारांना अर्थखातं नको, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हाती सगळं ‘कंट्रोलींग’ असल्याचा दावा करताना अजित पवारांना सरकारमध्ये किती दुय्यम स्थान हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, त्यासंदर्भात घोषणा न झाल्यास आम्ही काय भूमिका घ्यायची ते आज संध्याकाळी ठरवू. आम्ही दोघेही शर्यतीत असल्याचं भरत गोगावले यांनी बोलून दाखवलं आहे.

‘मला वाटतं मंत्रिमंडळ विस्तारासाठी जास्त काळ लागणार नाही. मुख्यमंत्र्यांनी आम्हा सर्व ‘जे काही वरिष्ठ नेते’ आहेत त्यांच्याशी चर्चा केली आहे. आज संध्याकाळपर्यंत निर्णय अपेक्षित आहे. एक दोन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं वाटतं, असा आशावाद मिंधे गटाच्या नेत्यांनी व्यक्त केला. खरंच उत्तर पाहिजे असेल तर मुख्यमंत्र्यांना तुम्ही विचारू शकतात असं म्हणत त्यांनी सारं ओझं मुख्यमंत्र्यांवर टाकत हात वर केले.

‘आम्हाला नोटीस वैगरे काही नाही, केंद्राचा मंत्रिमंडळ विस्ताराचा देखील संबंध नाही. कुणीतरी वावड्या उठवतं आणि त्यामुळे तुम्ही असं विचारतात’, असं म्हणत संजय शिरसाट यांनी टोलवा टोलविची उत्तरं दिली. तसंच ‘अर्थमंत्री पद अजित पवारांना मिळणार अशा सगळ्या बातम्या तुमच्या मीडियाकडून येतात. कुणी सांगितलं? मुख्यमंत्री, उपमुख्मंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अजित दादांनी सांगितलं का? तुम्ही लोक खाते वाटप करून टाकतात आणि आम्हाला अडचणीत आलतात. खातेवाटपासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही’, असंही शिरसाट यांनी वैतागून म्हणाले. तसेच ‘तिन्ही नेते एकत्र बसून चर्चा करतील आणि निर्णय घेतील. कोणतं खातं कोणाकडे जाईल तेव्हा आपण चर्चा करू’, असंही ते म्हणाले.

पालकमंत्रिपदासाठी मिंधे गटाची धडपड!

रायगडच्या पालकमंत्रीपदावरून प्रश्न विचारला असताना वस्तुस्थिती तिच आहे, त्याबद्दल दूमत असण्याचं कारण नाही. पालकमंत्रीपद शिवसेनेकडे रहावं ही कायमच मागणी आहे. उदय सामंतांकडे ते होतं आता आमचा नंबर लागला तर ते आमच्याकडे येईल असा बाण गोगावलेंली सोडला. पालकमंत्रीपदासाठी तटकरेंना आमचा विरोध राहिल, हे आम्ही सांगतो, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्हाला शब्द दिला आहे, अशी आठवण देखील त्यांनी यावेळी करून दिली. यामुळे तिन्ही पक्षांत दिसणारी शांतता ही वरवरची असल्याचं पुन्हा दिसून आलं आहे.

आता कुर्बानीसाठीही काही शिल्लक उरलं नाही! मिंधे गटाच्या नेत्यांनीच सांगितली अवस्था

आता जेवढं दिलं तेवढं बरच मोठं दिलं आहे. आता कुर्बानीसाठीही काही शिल्लक उरलेलं नाही. त्यामुळे आमच्या गटाचं म्हणणं आहे की आता पालकमंत्रीपद आपल्याला हवं, अशा मागणीवर मिंधे गट अडून बसल्याचं त्यांनी सांगितलं. मंत्रिपदासाठी आम्ही समजून घेतलं मात्र पालमंत्रीपदासाठी समजून घेण्याचा काही प्रश्नच आणि आम्ही समजून घेणार नाही, असं स्पष्ट केलं.