हॉटेल मॅनेजमेंट ते अभिनय

>>गणेश आचवल

सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर ‘लक्ष्मीच्या पावलांनी ’ ही मालिका सुरू आहे. या मालिकेत राहुल ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता म्हणजे ध्रुव दातार…एक प्रॉमिसिंग चेहरा.

ध्रुव मुळात इचलकरंजीचा आहे. अभिनय क्षेत्रात त्याच्या कुटुंबीयांपैकी कोणीच नव्हते. बारावीनंतर छत्रपती संभाजीनगर येथे ध्रुवने हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तो एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘बार टेंडर’ म्हणून कार्यरत होता. ध्रुव म्हणतो, ‘‘आपण अभिनय क्षेत्रात जाऊ असे कधी वाटलेच नव्हते. हॉटेल मॅनेजमेंट पूर्ण केल्याने त्याच्याशी निगडित असा एक केटरिंग व्यवसायदेखील मी पुणे येथे भागीदारीत सुरू केला होता. मला मॉडेलिंगची आवड होती. 2017 पासून मी प्रिंट मीडियासाठी काही पह्टो शूट्स करत होतो. काही जिमसाठीदेखील मी जाहिराती केल्या. पुण्यात अनेक ठिकाणी एका ब्रॅण्डसाठी मी केलेली पह्टो शूट्स झळकली होती. पण मग लॉकडाऊन झाला आणि चित्र बदलले.’’ लॉकडाऊनचा परिणाम हॉटेल व्यवसायावर झाला आणि त्यामुळे ध्रुवला केटरिंग व्यवसायात नुकसान सहन करावे लागले. तो पुन्हा इचलकरंजीला गेला. तिथे फिटनेसच्या संदर्भातील प्रशिक्षण घेऊन तो जिम ट्रेनर म्हणून काम करू लागला आणि लॉकडाऊन असताना तो जिमच्या संदर्भातील ऑनलाइन ट्रेनिंगचे लोकांनाही प्रशिक्षण देत होता. त्याचे इन्स्टाग्रामवरील पह्टो पाहून त्याला एका चित्रपटासाठी ऑडिशनसाठी बोलावले आणि तो चित्रपट म्हणजे नुकताच प्रदर्शित झालेला ओमी वैद्य अभिनित ‘आईच्या गावात मराठीत बोल’ या चित्रपटात त्याला भूमिका मिळाली.

ध्रुवचा करीअरचा प्रवास सोपा नव्हता. ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ मालिकेत त्याने भूमिका केली होती. त्याच्या चेहऱयाला ओळख मिळाली ती झी मराठीवरील ‘तू चाल पुढं’ या मालिकेत त्याने साकारलेल्या विक्रम मोहिते या नकारात्मक भूमिकेमुळे. ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या सध्या सुरू असलेल्या त्याच्या मालिकेविषयी तो सांगतो, ‘‘मी या मालिकेत राहुल ही नकारात्मक व्यक्तिरेखा साकारत आहे. ही मालिका म्हणजे तीन भावांची गोष्ट आहे. अद्वैत हा त्याचा मोठा भाऊ असतो आणि नेहमी अद्वैतला कुटुंबात दिले जाणारे महत्त्व राहुलला म्हणजे मला खटकत असते. राहुल कुटुंबात काही अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागतो. मला नकारात्मक भूमिका करायला खूप आवडतात, पण आपण एका इमेजमध्ये अडकता कामा नये हेदेखील मी सांगेन.’’

‘आईच्या गावात मराठीत बोल’मुळे ध्रुव चित्रपट माध्यमातून आपल्यासमोर आला आहे. ध्रुव सांगतो, ‘‘कितीही स्ट्रगल करावे लागले तरी ध्येय सोडू नका. सातत्याने प्रयत्न करत रहा. आपल्याला आपला मार्ग सापडतोच.’’ इचलकरंजी, पुणे असा प्रवास करत सध्या ध्रुव मुंबईत स्थायिक झाला आहे.