अपघातानंतर दुचाकी पेटली, दोन प्राध्यापकांचा होरपळून मृत्यू; गुरुपौर्णिमेच्या दिवशी बीडमध्ये घडली दुर्दैवी घटना

संपूर्ण देशभरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी होत असताना बीडमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. बीडहून शिरूरकडे निघालेल्या दोन प्राध्यमापकांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या कारना जोरदार धडक दिली. अपघातानंतर दुचाकीने पेट घेतल्याने दोन्ही प्राध्यापकांचा होरपळून मृत्यू झाला. बीड शहरापासून जवळच असणाऱ्या म्हसोबा फाटा येथेही ही घटना सोमवारी सकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरुर येथील कालीकादेवी महाविद्यालयामध्ये कार्यरत असणारे दोन प्राध्यापक बीडवरुन शिरुरकडे सकाळी साडेसात वाजता निघाले होते. शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या म्हसोबा फाट्याजवळ प्राध्यापकांच्या दुचाकीची कारला धडक झाली. या अपघातामध्ये अंकुश साहेबराव गव्हाणे (वय – 48) आणि शहादेव शिवाजी डोंगरे (वय – 50) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला. दुचाकी जळाल्याने मृत्यूमुखी पडलेल्या दोन्ही प्राध्यापकांचे मृतेदही होरपळले. या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही प्राध्यापकांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने बीड शहरासह शिरूर येथील कालीकादेवी महाविद्यालयात शोककळा पसरली आहे.