Lok Sabha Election 2024 : करण पवार यांच्या उमेदवारीचा धसका, जळगावात भाजप उमेदवार बदलणार

Lok Sabha Election 2024 -शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जळगावात करण पवार यांची उमेदवारी जाहीर करताच भाजपच्या पोटात पराभवाच्या भीतीने गोळा उठला. शिष्टाई मंत्री गिरीश महाजन यांनी लगोलग माजी खासदार ए. टी. पाटील यांची भेट घेऊन तासभर उमेदवार बदलावर मंथन केले. करण पवार यांना टक्कर देणार्‍या उमेदवाराची शोधाशोधही भाजपने सुरू केली आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना डावलून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. स्मिता वाघ यांच्या उमेदवारीवरून भाजपच्या स्थानिक पदाधिकार्‍यांमध्ये असंतोष धूमसत होता. खासदार उन्मेष पाटील, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी कालच शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी करण पवार यांना जळगाव लोकसभेची उमेदवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. करण पवार यांची उमेदवारी जाहीर होताच जळगाव भाजपमध्ये असंतोषाचा उद्रेक झाला. स्मिता वाघ यांचा आवाका लोकसभा लढवण्याचा नाही. त्यामुळे करण पवारांसमोर त्या टिकाव धरू शकणार नाही. त्यामुळे उमेदवार बदलण्यात यावा, अशी मागणी भाजपमध्येच सुरू झाली.

भाजपमधील असंतोषाची कुणकुण लागताच शिष्टाईमंत्री गिरीश महाजन यांनी माजी खासदार ए. टी. पाटील यांची भेट घेऊन तासभर मंथन केले. जळगाव आणि रावेरचा उमेदवार कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही, असे गिरीश महाजन यांनी छातीठोकपणे सांगितले. परंतु भाजप पदाधिकार्‍यांनी पराभवाचे गणितच मांडल्याने महाजनांची पंचाईत झाली. स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी ए. टी. पाटील यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु पक्षाने सर्व्हेचे कारण पुढे करून त्यांच्या नावावर फुली मारली होती.