अजित पवार गटाचा ‘गद्दार’ असा उल्लेख, शरद पवारांच्या बैठकीआधी दिल्लीत झळकले पोस्टर

अजित पवारांच्या बंडानंतर आज राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी दुपारी तीनच्या सुमारास ही बैठक होणार आहे. या बैठकीआधी अजित पवार यांच्या गटाचा ‘गद्दार’ असा उल्लेख असणारे ‘बाहुबली’ स्टाईल पोस्टर दिल्लीत झळकले आहेत.

बुधवारी मुंबईत ‘पॉवर’फूल गेम पहायला मिळाला. एका बाजुला अजित पवार, दुसऱ्या बाजुला शरद पवार यांनी बैठकीचे आयोजन केले होते. दोन्ही बाजुने जोरदार शाब्दिक चकमक झाली. अशातच अजित पवार यांनी पक्ष आणि घड्याळ चिन्हावर दावा ठोकला. त्यामुळे शरद पवारांनी वेगाने पावलं टाकण्यास सुरुवात केली. पक्षावरील पकड कायम ठेवण्यासाठी शरद पवारांनी गुरुवारी तातडीने राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये संघटनेतील आागमी बदल, पुढील रणनीती आणि कायदेशीर पर्यायांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने ‘गद्दार’ असा उल्लेख असणारे एक पोस्टर दिल्लीत लावण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर हे बाहुबली स्टाईल पोस्टर लावण्यात आले होते. या पोस्टरवर कटप्पा घात करून बाहुबलीला तलवार खुपसताना दाखवण्यात आले आहे.

‘सारा देश देख रहा है, अपनो में छुपे गद्दारों को, माफ नहीं करेगी जनता, ऐसे फर्जी मक्कारो को’, अशा ओळी यावर लिहिण्यात आल्या असून अनुल्लेखाने अजित पवारांवर निशाणा साधण्यात आला आहे. हे पोस्टर दिल्ली महानगर पालिकेने हटवले असले तरी याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अख्ख्या राष्ट्रवादी काँग्रेसवर अजित पवार यांचा दावा, राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून शरद पवार यांना हटवले

दिल्लीत शरद पवार यांच्या समर्थनार्थही पोस्टरबाजी करण्यात आली आहे. ‘सच और झुठ की लढाई में पुरा देश शरद पवार साहेब के साथ है’, अशा ओळींसह सोनिया दुहन यांनीही पोस्टर लावले असून या पोस्टवर शरद पवारांसह सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांचाही फोटो आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर अजित पवार यांचे फोटो असणारे जुने पोस्टरही काढण्यात आले आहेत.