…तर पेट्रोल 15 रुपये लिटर मिळेल, नितीन गडकरी यांनी सांगितला फॉर्म्युला

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आगामी काळात पेट्रोल 15 रुपये लिटर (Petrol price) मिळू शकते असे म्हटले आहे. यासाठी त्यांनी एक फॉर्म्युलाही सांगितला आहे. उदयपूरमधील प्रतापगड येथे बोलताना त्यांनी यासंबंधी विधान केले.

गडकरी म्हणाले, 60 टक्के इथेनॉल आणि 40 टक्के वीज वापरल्यास पेट्रोल 15 रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध होऊ शकते. यामुळे फक्त प्रदूषण कमी होण्यास मदत होणार नाही, तर इंधन आयातीचाही खर्च कमी होईल.

सरकारच्या या धोरणामुळे जनतेचे भले होईल, शेतकरी अन्नदात्यापासून ऊर्जादाता बनेल. सध्या इंधन आयातीचा खर्च 16 लाख कोटी होत असून यामुळे हे पैसे थेट शेतकऱ्याच्या घरात जातील असेही केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले की, ऑगस्टमध्ये टोयोटा कंपनीच्या गाड्या लॉन्च करणार आहे. यात 100 टक्के प्लेक्स इंधन इंजिन असेल आणि ही गाडी 100 टक्के इथेनॉलवर चालेल. आगामी काळात सर्व वाहने शेतकऱ्यांनी निर्मिती केलेल्या इथेनॉलवर चालताना दिसतील. सरकारी पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबवत्व कमी करण्यासाठी नवीन योजना आणत असल्याचेही गडकरी म्हणाले.