विकलेला खासदार रायगडकर पुन्हा स्वीकारणार नाहीत, रोह्यात इंडिया आघाडीचा मेळावा

बहुतेक दुकानांमध्ये एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही अशी पाटी लावलेली असती. त्याच धर्तीवर रायगडकरही एकदा विकलेला खासदार पुन्हा स्वीकारणार नाहीत. विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना शरद पवार यांनी भरभरून दिले. मात्र त्यानंतरही सत्तेच्या मोहापायी त्यांनी पवार यांच्या पाठीत खंजीर खुपला. खोक्यांच्या मागे धावत भाजपबरोबर गेलेले तटकरे पुन्हा पलटी मारणार नाहीत याची कोणीही गॅरंटी देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचा या निवडणुकीत कडेलोट होणार आहे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रोहा येथे केला आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी रोहा येथील मारुती चौकात आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुनील तटकरे, मिंधे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली. मागील निवडणुकीत विदेशातून काळा पैसा आणल्यानंतर प्रत्येकाच्या खात्यात प्रत्येकी १५ लाख रुपये जमा केले जातील. हजारो तरुणांच्या हाताला रोजगार दिला जाईल असे आश्वासन मोदी यांनी दिले होते. मात्र ही सर्वच आश्वासने फोल ठरली असे अंधारे यावेळी म्हणाल्या.

शेकापचे आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख, माजी आमदार अनिल तटकरे, मराठी – मुस्लिम संघटना नेते सुबहान शेख, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, शेकाप नेते शंकर म्हसकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील देशमुख, काँग्रेस सुनील सानप, तालुकाप्रमुख समीर शेडगे, गणेश मढवी, शहरप्रमुख दीपक तेंडुलकर, अल्पसंख्याक अध्यक्ष मुजम्मील येरुणकर, उस्मान रोहेकर, आम आदमी पार्टीचे डॉ. रियाज पठाण, राजेश काफरे, अरिफ पठाण आदी याप्रसंगी उपस्थित होते.