भविष्यातल्या शोध मोहिमेची कथा

प्रोमिथियस हा रिडली स्कॉट या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा ‘साय-फाय हॉरर’ प्रकारात मोडणारा चित्रपट आहे. 2012 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट कहाणी सांगतो ती 2093 मधल्या, अर्थात भविष्यातल्या एका शोध मोहिमेची. ही शोध मोहीमदेखील खास आहे. शोध घेतला जात आहे निर्मात्याचा अर्थात मानवाला बनवणाऱया निर्मात्याचा. चित्रपटाच्या सुरुवातीला सजीवांच्या उत्पत्तीपूर्वीची पृथ्वी दाखवली आहे. अचानक तिथे एक एलियन्सचे अर्थात परग्रहवासीयांचे यान अवतरते. पर्वताच्या एका टोकावर उभा राहून मग एक एलियन विचित्र रंगाचे एक पेय पितो आणि अचानक त्याचे संपूर्ण शरीर वितळायला सुरुवात होते. ते वितळणारे शरीर खाली पाण्यात कोसळते आणि एलियनचा एक डीएनए वेगळा होतो. या डीएनएपासून सजीवांच्या उक्रांतीची सुरुवात झाली असे दाखवण्यात आले आहे.

पहिल्या दृश्यानंतर चित्रपट थेट 2091 सालात पोहोचतो. उक्रांतीला सुरुवात होऊन आता 30 ते 35 हजार वर्षे उलटली आहेत आणि मानवाने सर्वच क्षेत्रांत थक्क करणारी प्रगती केली आहे. अशातच स्कॉटलंडच्या एका गुहेत पुरातत्त्व संशोधक डॉ. एलिझाबेथ शॉ आणि तिचा प्रियकर चार्ली यांना एका गुहेत रंगवलेले अत्यंत पुरातन असे चित्र सापडते. मानवसदृश एक आकृती काही नक्षत्रांकडे इशारा करत असते. अगदी हुबेहूब अशाच प्रकारचे चित्र जगाच्या वेगवेगळ्या कोपऱयात त्यांना आढळून आलेले असते. जेव्हा मानवी संस्कृती प्रगत नव्हती, प्रवासाची साधनेदेखील नव्हती अशा काळात इतकी हुबेहूब दिसणारी चित्रे जगाच्या कानाकोपऱयात कोणी आणि का रेखाटली? हा प्रश्न आता उभा राहतो.

हे चित्र म्हणजे एक प्रकारचा ‘स्टार मॅप’ (नक्षत्रांचा नकाशा) असल्याचे आणि ज्यांनी मानवाची निर्मिती केली ते आपल्याला या नकाशाच्या मदतीने त्यांचे निवासस्थान दाखवत आहेत आणि आपल्याला भेटीला बोलावत आहेत असे डॉ. शॉचे मत बनते. तिच्या या शोधानंतर नकाशात दर्शविलेल्या ग्रहाकडे अर्थात ‘एलव्ही-223’ कडे जाण्यासाठी एक मोहीम आखण्यात येते. एका मोठय़ा आणि प्रसिद्ध कंपनीचा अब्जाधीश मालक या मोहिमेचा खर्च उचलतो. अर्थात यामागे त्याचा स्वतचा असा एक विशिष्ट हेतूदेखील असतो, जो शेवटाला उघड होतो. डॉ. शॉ, चार्ली यांच्या जोडीला विविध क्षेत्रांतील तज्ञ, संशोधक, पायलट यांची एक टीम बनवली जाते. य्ढ़ढ़ढ़ा सर्वांच्या जोडीला डेव्हिड नावाचा हुबेहूब माणसासारखा दिसणारा, बोलणारा ह्युमनॉईडदेखील रवाना केला जातो.

डेव्हिडच्या हाती सर्व व्यवस्था सोपवून टीममधला प्रत्येक जण आपापल्या स्लीपिंग बॅगमध्ये ‘गाढ निद्रेत’ रवाना होतो. पृथ्वीपासून रवाना झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर ते इच्छित ठिकाणाजवळ पोहोचतात. आता डेव्हिड एक-एक करून सर्वांना निद्रेतून जागे करतो. त्या ग्रहावर नैसर्गिक जागांबरोबरच एक कृत्रिमरीत्या बांधण्यात आलेले बांधकामदेखील त्यांना दिसते आणि ते आश्चर्यचकित होतात. डॉ. शॉ आणि तिचे काही सहकारी त्या गुहेत शिरण्याचा निर्णय घेतात. ग्रहावरील वातावरणात प्रचंड कार्बन डायऑक्साईड असताना त्या गुहेत मात्र चक्क पृथ्वीसारखे वातावरण असल्याचे त्यांना आढळते. गुहेत ते ऑक्सिजन हेल्मेटशिवायदेखील सहजपणे श्वास घेऊ शकत असतात.

गुहेत शोध घेताना त्यांना काही रांजणाच्या आकाराची मडकी आणि एका विशालकाय एलियनचे शरीरदेखील सापडते. त्या एलियनचे डोके घेऊन ते यानाकडे परततात. इकडे सर्वांच्या नकळत डेव्हिड त्या रांजणांपैकी एक रांजण उचलून घेतो. ज्याप्रमाणे मानवाची निर्मिती केली त्याचप्रमाणे हे एलियन्स अन्य प्रजातीदेखील तयार करण्याच्या प्रयत्नात होते आणि त्या मडक्यांमध्ये अशाच एका प्रजातीचे डीएनए आहेत हे तपासाअंती डेव्हिडच्या लक्षात येते. आता या डीएनएचा मानवावर काय परिणाम होतो ते बघण्यासाठी तो त्या डीएनएला चार्ल्सच्या नकळत चार्ल्सच्या शरीरात सोडतो.

हा डीएनए नक्की काय कमाल दाखवतो? डॉ. शॉला वाटत असते तसे हे एलियन्स खरंच मानवाचे निर्माते असतात की मानवाला संपूर्णपणे नष्ट करण्याच्या विचारात असतात? त्या ग्रहावर एलियन्स नक्की कोणती दुसरी प्रजाती बनवण्याच्या प्रयत्नात असतात? त्यांचा प्रयोग यशस्वी झालेला असतो का? डेव्हिडचे नक्की मनसुबे काय असतात? अशा अनेक प्रश्नांची रोमांचक उत्तरे मिळवण्यासाठी या प्रोमिथियस अंतराळयानाची सफर अनुभवायलाच हवी.